नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन चला गाडगेबाबांचे विचार जपुया, गरिबांच्या मुलीच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम ३ एप्रिल २०२४ ला येरला ता. जिल्हा नागपूर येथें काळाचा प्रचंड आघात झालेल्या संतोषी चंद्रकांत इंगळकर या मुलीच्या घरी जाऊन पोहोचला.
येत्या १८ एप्रिल ला येरला येथील संतोषी ताईंचे लग्न होत आहे. जीवनाच्या नवीन पर्वात ती प्रवेश करणार आहे. बालपण हालाकीच्या परिस्थितीत गेले. आता तारुण्यात पदार्पण करताच, भावी आयुष्याचे स्वप्न पहात असताना, २०२३ परतीच्या वाटेवर असतांना डिसेंबर महिन्यात काळाने इतका मोठा आघात केला की क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपघातात आई गेली तर टेलरिंग काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे वडील चंद्रकांतराव पाठीचा कणा तुटल्यामुळे एका जागचे झाले. येथे चंद्रकांतरावांच्या पाठीचा कणा नव्हे तर जणू घराचाच कणा मोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
७२ वर्षाच्या आजी इंदूबाई यांच्यावर आता संपूर्ण घराची जबाबदारी आली आहे. त्यांना मिळणाऱ्या निराधारच्या अनुदानातून व संतोषीच्या मामाच्या मदतीतून आपल्या लंगड्या पायाने घराचा गाडा त्या कसाबसा ओढीत आहे. संतोषीचे बाबा आपल्या अश्रू नयनांनी ही सर्व परिस्थिती झोपल्या जागेवरून पहातात. त्यातच आपल्या एकुलत्या एका नातीचे अपघात होण्याअगोदर जुळलेले लग्न आपल्या मुलाच्या डोळ्यासमोर व्हावे अशी आजीची मनोमन इच्छा परंतु आता लग्न कसे करणार हा प्रश्न आजीला पडला आहे. त्यातही संतोषीच्या बाबाची तब्येत दिवसेंदिवस इतकी खराब होत चालली आहे की.
संबंधित बातमी :
त्यांच्या पोटात थोडे फार अन्न जावे म्हणून गळ्यात नळ्या सोडण्यात आल्या आहे. बाबांनी आपल्या लग्नापर्यंत तरी आशीर्वाद देण्यासाठी जीवंत रहावे यासाठी संतोषी मोठ्या प्रमाणात धडपडत आहे. परंतु नियतीसमोर हे सुद्धा अशक्य दिसत आहे. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत कर्मयोगीने संतोषीला या कठीण काळात थोडाफार आधार मिळावा, तिचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक व देविदास लाखे यांच्या हस्ते १० हजार रुपयांची मदत करून तिला साडीचोळी देऊन तिला प्रेमरूपी आधार दिला.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू नयनांनी संतोषी म्हणाली की काळाच्या आघातात आई तर गेली परंतु माझे बाबा माझ्या लग्नापर्यंत वाचावे ही माझी मनोमन इच्छा आहे. त्यासाठी मी देवाला सारखी प्रार्थना करत आहे. खरंच आज कर्मयोगी फाऊंडेशन आमच्या घरी देवासारखं आलं, तुम्ही जो मला आज आधार दिला, त्याला मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. यावेळी गावचे सरपंच अनिल काळमेघ उपसरपंच राजेंद्र अखंड ग्रामपंचायत सदस्य प्रशांत तभाने लता कुंभरे, पूनम दहाट, गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.