नागपुर (महाराष्ट्र) : चला गाडगेबाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम कर्मयोगी अतिशय विनर्मतेने ग्रामीण भागात राबवित आहे. भगवान महावीर जयंती कृतीतून साजरा करण्यासाठी हा उपक्रम घेऊन कर्मयोगी इसासनी येथील पतीचे छत्र हरविलेल्या, आपल्या पाच मुलांसाठी संघर्ष करणाऱ्या व कांचन या लहान मुलीच्या लग्नाची तयारी करत असणाऱ्या छायाताई शेंडे यांच्या घरी जाऊन पोहोचले. येत्या १ मे ला जागतिक कामगार दिनाला कांचन ताईचे लग्न होत आहे. ती जीवनाच्या नवीन प्रवासाला सुरवात करणार आहे. वयाच्या पाचव्या वर्षी नियतीने कांचनला वाडीलांपासून पोरके केले व आई छायाताईच्या गरिबीने फाटलेल्या पदरात पाच मुलांना टाकून गेले.
अशोकराव यांना दमाची बिमारी, त्यातही हातावर आणून पानावर खाणे इतकी दयनीय परिस्थिती त्यामुळे योग्य उपचार घेता आले नाही। व या दमाने जीवनाचा रथ शेवटी २००८ मध्ये थांबविला. छायाताईची छत्रछाया हरविली आता या निरागस मुलांना कोणाच्या पदराखाली छाया द्यायची हा मोठा विचार असतांना आपल्या फाटलेल्या संसाररूपी पदराची गाठ बांधत गवंडी कामाला जात आपल्या चार मुली व लहान मुलाला मोठं केलं. गरीब परिस्थितीमुळे दहावीच्या पलीकडे कोणी शिकलं नाही. सर्वानी आपल्या आईसोबत मिळेल ते काम करत आपल्या आईला आधार दिला. या काळात काकांच्या सहकार्याने, अरुणा, सविता, निकिता या तीन बहिणीचे लग्न झाले.
कांचन १८ वर्षाची झाली व छायाताईला तिच्या लग्नाची चिंता लागली. चिंता आणखीनच गंभीर झाली कारण काकांनी सहकार्य करणे सोडले. तरीही कांचन कपडे दुकानात ४५०० हजार रुपयाने काम करून व भाऊ निलेश कँटरिंगच्या कामाला जाऊन आईला मदत करत आहेत. यावर्षी छाया ताईंच्या प्रयत्नांना यश आले व कांचनने २१ व्या वर्षात पदार्पण करताच लग्न चंद्रपूरच्या मुलाशी जुळून आले. आता वऱ्हाड चंद्रपूर वरून येणार आहे, त्यांची व्यवस्था कशी करणार हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून छायाताई लग्न जवळ आले असतांना सुद्धा कामाला जात आहे. कांचन आपल्या लग्नाची तयारी न करता दुकानात कामाला जात आहे.
संबंधित बातमी:
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत व छाया ताईंचा जीवघेणा संघर्ष पहात कर्मयोगीने कांचनचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी प्रेम, अहिंसा व सत्याचे उपासक भगवान महावीर यांच्या जयंतीला गिरीश महाजन व अनुराधा महाजन यांच्या हस्ते १० हजार रुपयांची मदत करून तिला साडीचोळी देऊन कृतीतून भगवान महावीर जयंती साजरी करत छायाताईंच्या परिवाराला प्रेमरूपी छाया दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक इंगळे ज्येष्ठ पत्रकार गजानन ढाकुलकर, आदर्श शिक्षक प्रशांत ढोले, राजेश रहांगडाले, वनिता रहांगडाले, गावकरी मंडळी व कर्मयोगीचे सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.