नागपुर (महाराष्ट्र) : गाडगे बाबांचे विचार जपत गरीब मुलींच्या लग्नाला मदत करण्याचं कार्य कर्मयोगी फाऊंडेशन सातत्याने करत विदर्भात किती मोठ्या प्रमाणात गरिबी आहे याचे विदारक चित्र प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर आणत आहे. कर्मयोगीची मदतीची ही वारी गुढीपाडव्याच्या दिनी काजळी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथील प्रिती बालाजी कुडमते या मुलीच्या घरी जाऊन पोहोचली.
येत्या २६ एप्रिल ला प्रिती ताईंचे लग्न होत आहे. जीवनाच्या नवीन पर्वाला ती सुरवात करणार आहे. नियतीने असा खेळ खेळला की ज्या दिवशी प्रितीचा दाहवा जन्मदिवस असताना कामावर असणाऱ्या बाबांची तब्येत अचानक खराब झाली व तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. आता प्रीतीचा येणारा प्रत्येक जन्मदिवस हा आज बाबाची पुण्यतिथी आहे. याची आठवण करून देत परिवारातील सर्वांच्या डोळ्याना धारा लावून जातो. बाबा गेल्यानंतर आईने शेतमजुरी करून आपल्या कुळामतीच्या घरात प्रीती व प्रतीक्षा या दोन बहिणींना लहानाच मोठं केलं. घरची परिस्थिती इतकी हालाकीची आहे की तिन्ही ऋतूचं घरात सरळ सरळ आगमन होत. छताला जुन्या साळ्यांचा आधार देण्यात आले आहे. पावसाळ्यात घरातील भांडे घराची गळती थांबवायला कमी पडतात.
संबंधित बातमी
अशा परिस्थितीत गावात शिक्षणाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे व दोन्ही बहिणींचा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे प्रितीने त्यागाची भूमिका घेतली आपले शिक्षण आपल्या लहान बहिणीसाठी थांबबिले. प्रितीच्या आई नंदाताई यांना आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव असल्यामुळे आपल्या दोन मुलीचे कसे होणार याची त्यांना सतत चिंता लागली आहे. प्रिती १८ वर्षाची होताच त्यांच्या डोक्यात प्रितीच्या लग्नाचे वारे वाहू लागले व प्रितीने १९ व्या वर्षात पदार्पण करताच लग्नाचा योग जुळून आला. मुलगा इतका समजदार मिळाला की त्याने कुडमते परिवाराची परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाचा सर्व खर्च स्वतः करण्यास पुढाकार घेत लग्न सुद्धा स्वतःच्याच घरी करण्याचं ठरविलं.
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत कर्मयोगीने प्रीतीचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी गुढीपाडव्याच्या दिनी आनंदाची, प्रेमाची गुढी उभारत १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन कृतीतून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी भावना व्यक्त करताना प्रीती म्हणाली की सकाळी कामाला जाणे व दुपारी धावतपळत शाळेला जाणे असा आमचा संघर्षमय प्रवास, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आम्हाला आमच्या फाटक्या घरातूनचं दिसतो, बाबाला चार भाऊ पण कोणीच आम्हाला साधा धीर द्यायला पण तयार नाही.
म्हणूनच लग्न मुलाच्या घरून घेतले, आईचे जीवघेणे कष्ट आम्हाला आता बघता बघत नाहीत अशात कर्मयोगी आमच्या येथे आले व आम्हाला जे सहकार्य केले ते माझे बाबा गेल्यापासून कोणीतरी केलेली पहिली मदत आहे, जी आम्हाला गरज असताना आली, त्यामुळे माझ्या आईच्या खांद्यावरचा थोडाफार भार तरी कमी होणार आहे त्याबद्दल मी कर्मयोगीचे धन्यवाद मानते. यावेळी गावची प्रतिष्ठित मंडळी व कर्मयोगी परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.