नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशनने चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया या शीर्षकाखाली आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वानुसार २०२४ मध्ये आईवडिलांचे छत्र हरविलेल्या गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नाला प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा संकल्प केला आहे.
कर्मयोगीने या संकल्पाचा श्रीगणेशा २३ मार्च ला बिबी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथून केले. बिबी येथील नंदिनी शेटे या मुलीचे लग्न येत्या १८ एप्रिल २०२४ ला होत आहे. जीवनाच्या नवीन पर्वात ती प्रवेश करणार आहे. बालपण हालाकीच्या परिस्थितीत घालविणाऱ्या, काळाने वयाच्या दहाव्या वर्षी आईला हिरावून घेतले. त्यानंतर ,सोनाबाई चलाख याआईच्या आईने म्हणजे आजीने त्यांना शेतमजुरी करून मोठे केले. या काळात नंदिनी व तिच्या लहान भावाकडे वडिलांनी ढुंकुन सुद्धा पाहले नाही. आजी आता थकली आहे.
माझ्यानंतर माझ्या नंदिनीचे लग्न कोण करणार ही चिंता तिला सतत असल्यामुळे नंदिनी १९ व्या वर्षात पदार्पण करताच आजीने तिचे लग्न जुळविले. आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या नंदिनीचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी कर्मयोगीने या कार्यासाठी आर्थिक सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विनायक इंगळे गुरुजी यांच्या हस्ते १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना नंदिनी म्हणाली की अत्यंत गरिबीच्या दिवसात आजी सोबत कामाला जात मी मोठी झाली. आईबाबाचे प्रेम काय असते ते कधी बघितलेच नाही. आता आजी थकली त्यामुळे तिने माझ्यानंतर माझ्या नातीचे कसे होणार या चिंतेने कमी वयात माझे लग्न जुळविले.
आजपर्यंत आम्हाला कोणीच मदत केली नाही व कोणी मदत करणार अशी आशाही नव्हती आणि आज कर्मयोगीने आमच्या घरी येवून जो आज आनंद पेरला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायला माझ्याकडे शब्द नाहीत असे म्हणत नंदीनेने आपल्या अश्रूंच्या वाटा मोकळ्या करून दिल्या तेव्हा सर्व उपस्थित मंडळी भावुक झाली होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गजानन ढाकुलकर शेतकरी नेते रवि गव्हाणे गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होता