नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशनने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी २०२३ मध्ये १२५ सायकल वाटपाचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा २५ सायकल वाटपाचा चौथा टप्पा स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना उजाळा देत व संविधान दिनाचे औचित्य साधत लासेनार इंडिया प्रा. ली. बुटीबोरी यांच्या सौजन्याने २६ नोव्हेम्बर २०२३ ला आई सभागृह बुटीबोरी येथे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या २५ बाल सावित्रीना सायकली देवून महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व संविधान दिन कृतीतून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लासेनार इंडिया प्रा. ली. बुटीबोरीचे संचालक सचिन चौधरी उदघाटक कृधी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे सभापती अहमदबाबू शेख, प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. सचिन पावडे, दिनकर कडू, डॉ. प्रशांत कडू, मनोहर पोटे, महेंदसिंह चौहान ही मान्यवर मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात सचिन चौधरी म्हणाले की कर्मयोगी ग्रामीण भागात अतिशय सुंदर व मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. या मुलांना सायकल देऊन होणार नाही तर त्यांच्या घरी जाऊन ही सायकल जर खराब झाली तर त्यांची तीं सायकल दुरुस्त करण्याची तरी परिस्थिती आहे का हे जाणून घ्यावे लागेल.
त्यामुळे आमची लासेनार कंपनी येणाऱ्या दिवसात कर्मयोगीला सोबत घेऊन या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावेल. विशेषतः आमच्याकडे ९५ टक्के कामगार या भागातील स्थानिक लोकं आहेत, त्यामुळे कोणालाही काही अडचण असल्यास त्यानी माझ्यासोबत किंवा कर्मयोगी फाऊंडेशनशी संपर्क साधावा आम्ही तुम्हाला शक्य ती मदत करू असे ते यावेळी आवर्जून म्हणाले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी सांगितले की आमच्या आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींना बाल सावित्री मानून त्यांना सायकल देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलविले व आमचा जो स्वागतापासून ते जेवणापर्यत मानसन्मान केला ते पाहून आजच्या युगातही इतके चांगले लोक आहेत हे पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहेत.
तसेच हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी प्रामुख्याने संजय चिकटे, प्रभाकर देशमुख, संजय धोटे, देवीदास लाखे, राजू गावंडे, योगेश सातपुते, सुधाकर धामंदे, प्रविणा शेळके मंगेश सवाने, कमलाकर अवचट, चंदू बोरकर, नारायण भिसे, विगेश तागडे, रवींद्र दारूंडे व दूरदूरच्या गावावरुन आलेली अनेक मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.