नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे जीवनात दुःखाचा डोंगर कोसळलेल्या, सुखी संसाराची स्वप्न अर्धवट राहिलेल्या ५१ विधवा ताईंना भरभरून प्रेम देत त्यांना आत्मीयतेने साडीचोळीची ओवाळणी देत आई सभागृह बुटीबोरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मयोगी भाऊबीज आनंदोत्सव सोहळा २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नागपूरचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर उदघाटक भाजपा नागपूरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रमुख उपस्थितीमध्ये अमिताभ पावडे निलिमा बावणे, डॉ प्रशांत कडू, ज्ञानेश्वर रक्षक ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती. अध्यक्षीय भाषणात बंडोपंत उमरकर म्हणाले की कर्मयोगीने विधवा ताईंसाठी जो भाऊबीज आनंदोत्सव सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तो अतिशय प्रेरणादायी आहे. या दुःखीकष्टी जीवनयोद्धा ताईंना तुम्हालाही कर्मयोगीचा आधार आहे ही जाणीव करून दिली आहे. असे उपक्रम गावागावात साजरे करण्यात यावे अशी त्यांनी इच्छा बोलून दाखविली.
उदघाटनिय भाषणात सुधाकर कोहळे म्हणाले की इतकं शिस्तबद्ध पध्दतीने कार्य करणार सामाजिक संघटन मी आजपर्यंत बघितलं नाही. कर्मयोगीने या महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना भाऊबीजेची भेट द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. हा आनंदोत्सव सोहळा पाहून महिला भारावून गेल्या होत्या त्या म्हणाल्या आमची भाऊबीज इतकी सुंदर कोणी करू शकते यावर आमचा विश्वासच बसत नाही आहे, हे सर्व आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावागावातून अनेक मंडळी आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.