लातूर (महाराष्ट्र)/हैदराबाद : समाज सुखी आनंदी राहण्यासाठी सामाजिक तोल सांभाळणे गरजेचे असते. समाजातील आदर्श आणि महानता यांची जाणीव करून देण्यासाठी नाटके प्रभावी माध्यम आहेत. परंतु नाटकात सुख मांडताना भाबडेपणा व दुःख मांडताना श्रोत्यांच्या मनावर जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. काळजाला हात घालणारे संवाद लेखन करत असताना सामाजिक जाणीवा जपत मनोरंजनातून प्रबोधन करणारे, संवेदनशील स्त्री जीवनातल्या वर्तमान काळात जगण्यासाठी आत्मविश्वासाचा झोका देणारे नाटक म्हणजे ‘उंच माझा झोका गं!’. हे होय. असे मत नाटककार राम भुरे यांनी व्यक्त केले.
बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादाच्या 284 व्या पुष्पात साहित्यिक तथा नाटककार राम भुरे यांनी अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखित उंच माझा झोका गं! या साहित्यकृतीवर संवाद साधताना कांही पात्राचे उत्तम सादरीकरण करून दाखवत पुढे म्हणाले की, स्त्रियांना जगण्याचे बळ देणाऱ्या उंच माझा झोका गं! या नाटकाबरोबरच इतर चार एकांकिकाही या पुस्तकात आहेत. ‘चिंगी’ मध्ये आजोबा आणि नातीच्या आंतरिक जिव्हाळ्याची कथा असून, ‘साबरीत’ पालकांनी आपल्या महत्त्वकांक्षा पाल्यावर लादुन केला जाणारा अन्या अत्याचार दाखवला गेला आहे.
तर ‘वात्सल्य’ मध्ये देवळात माणसाच्या श्रद्धेचा लिलाव करून स्वतःची खळगी भरणारी माणसं दाखवली गेली आहे. याबरोबरच ‘उरूस’ या एकांकिकेत बळीराजा कधी निसर्ग तर कधी राजकीय सामाजिक व्यवस्थेमुळे कसा हतबल होतो याचे चित्र केले गेलेले आहे. हे सांगतानाच स्त्री जीवनाच्या सहनशीलतेचे हेलकावे, आयुष्याची आयुध सांभाळताना हौसेचा प्रवास करणे अवघड असते. नवं करण्याची जिद्द, नवा विचार, नवे विषय, नवी मांडणी याबरोबरच प्रेक्षकांची नाळ या साहित्यकृतीमध्ये जोडली गेल्याचे जाणवते.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रसिद्ध नाटककार तुळशीदास बिरादार म्हणाले की, मी जो नाही तो दाखवणे म्हणजे नाटक होय. शेवटी अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पाटील म्हणाले की वर्तमान काळात स्त्रियांना आत्मविश्वासाने जगण्याचा झोका देणारे संवाद या नाटकात आहेत तर ते प्रभावीपणे मांडण्याचे काम राम भुरे यांनी केले आहे. अत्यंत प्रभावी ठरलेल्या या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र एकंबेकर यांनी केले तर आभार आदित्य जाधव यांनी मानले.