नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा आपला उपक्रम घेऊन चौदावी लग्न कार्याला मदत करण्यासाठी वडिलांचे छत्र हरवलेल्या वाघदरा ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. संगीता शालीकराव अंबाडारे ताईच्या घरी महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी जाऊन पोहोचले. येत्या १८ मे ला संगिता ताईचे लग्न होत आहे. ती सुखी संसाराच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला सुरवात करणार आहे. सांगिताला ज्योत्सना सिमा या दोन मोठ्या बहिणी व दिनेश हा मोठा भाऊ या चार मुलांचा सांभाळ कमी वयात लग्न झालेल्या येणुताई स्वतःच्या जन्मापासून तर आजपर्यंत जीवघेणा संघर्ष करीत करत आहेत.
घरातील गरिबी पाहून वयाच्या सोळाव्या वर्षी आईवडिलांनी येणुताईचे लग्न लावून दिले. लहानपणी आईवडिलांचा मारखाणे स्वाभाविक असते, परंतु लग्नानंतर सुद्धा पती शालीक यांच्या शिव्या व मारझोड येणुताईंच्या वाट्याला आल्या. शालीकराव यांना मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते, त्यामुळे मिळेल ते काम करणे व मिळालेल्या पैशाची दारू पिणे हा त्यांचा नित्यक्रम. अशाही परिस्थितीत चार मुलं त्यांच्या घरात जन्माला आली. येणुताई फळभाजीपला विकून आपल्या मुलांना मोठं करत होत्या तर शालीकराव रोज रात्री दारू पिऊन येऊन मारझोड, शिवीगाळ करत घरी धिगाना घालत होते. आता हे नित्यनियमाचे झाले होते. मरण येत नाही म्हणून जगणे सुरू होते अशी येणुताईच्या परिवाराची अवस्था होती. त्यामुळे चारही मुलं दहावीच्या पुढ शिकू शकली नाही.
२०१२ मध्ये दारूच्या नशेत दुधात विष घेऊन शालीकराव यांनी आपली जीवनयात्रा संपवित कुळामातीचे घर व आतापर्यंत दिलेल्या वेदना येणुताईच्या वाट्याला सोडून गेले. याही परिस्थितीत येणुताईनी आपल्या दोन मोठया मुलींचे लग्न लावून दिले. या दिवसात कुळामतीच्या घराची जागा शासकीय घरकुलने घेतली. या घरात यमुबाईचा मुलगा दिनेश आता कमावता झाला, परंतु त्याने आईच्या जीवघेण्या संघर्षाची जाणीव न ठेवता मिळालेले पैसे आपल्या आईला न देता स्वतःसाठी व मित्रांसाठी खर्च करण्याला प्राधान्य दिले. कधी संपणार नारी तुझा वनवास अशी येणुताईची परिस्थिती असताना आता ताईला आपली लहान मुलगी संगिताच्या लग्नाची काळजी लागली होती. या काळजीचे निराकरण २०२४ च्या सुरवातीला झाले भिवापूर कडील अतिशय समजदार मुलासोबत संगीताचे लग्न जुळून आले. मुलाने एक पैसाही न घेता लग्नाचा सर्व खर्च उचलत लग्न आपल्या घरून करण्याचे ठरविले. गेल्या एका वर्षापासून वाघदरा येथील गोंडवाना वसतिगृहात ५ हजार रुपये महिन्याने कामाला जावून लोकांची देनदारी चुकवत आपल्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी येणुताईनी फक्त ३५० रुपयांची साडी घेतली आहे. स्वतः साठी तर काहीच नाही.
संबंधित बातमी-
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत, येणुताई यांच्या वेदना कमी करण्यासाठी कर्मयोगीने संगिताचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी वीर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत करत तिला साडीचोळी देऊन कृतीतून महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करून एक आदर्श वाघदरा गावासमोर निर्माण केला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना संगीता म्हणाली की लहानपणापासून बाबांचा मार खात व दारूमुळे घर कसं विनाशाला जाते हे पहात मोठे झाले. आईचे कष्ट व तिच्या वेदना कमी होण्यासाठी मी शाळा सोडून आईसोबत कामाला जायची आता माझे लग्न जुळले व तुम्ही आमच्यासाठी जी मदत घेऊन आले ती. माझ्या आयुष्यातली कोण्या संस्थेने केलेली पहिली मदत आहे. त्याबद्दल मी मनापासून कर्मयोगीचे आभार मानते. यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगीचे सदस्य हा मदतीचा व प्रेमाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.