नागपुर: कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सेवाभावी संघटन आहे. २०१९ पासून कर्मयोगी नवरात्रात विधवा महिलांना साडीचोळी देऊन सन्मानित करत आहे. आपल्या देशात नवरात्रात देवीला साडीचोळी देऊन ओटी भरण्याची प्रथा आहे. परंतु देवी तर जगाची पालनकर्ता आहे तिला साडीची गरज आहे का?
नारी शक्तीचा सन्मान व्हावा म्हणून व आपल्या विचारात परिवर्तन व्हावे या पवित्र उद्देशाने देवीला अपेक्षित अशाप्रकारे नवरात्रोत्सव साजरा करत यावर्षी सुद्धा १०१ विधवा ताईंना नवरात्रात साडीचोळी देऊन सन्मानित करण्याचा संकल्प दोन टप्प्यात घेण्यात आला आहे, त्याचा पहिला टप्पा दि. १५ ऑक्टोबर २०२३ ला तळेगाव दशासर येथे ४० विधवा ताईंमध्ये देवीचे स्वरूप पहात साडीचोळी देऊन सन्मानित करत या ताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत कृतीतून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता आंतर्विध्या अभ्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे डॉ प्रशांत कडू कार्यक्रमाचे उदघाटक ठाणेदार तळेगाव दशासरचे रामेश्वर धोंडगे प्रमुख उपस्थिती सरपंच तळेगाव दशासरच्या मीनाक्षी ठाकरे , सामाजिक कार्यकर्ते नागपूरचे संजय धोटे, आजीवन ग्रामगीता प्रचारक नागपूरचे देवीदास लाखे, सामाजिक कार्यकर्त्या सौ माधुरी दुधे, सौ वैशाली ठाकरे, भाऊरावजी बगाळे ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ प्रशांत कडू म्हणाले की खऱ्या अर्थाने गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच काम विदर्भात मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम कर्मयोगी करत आहे. देवीला साडीचोळी देऊन ओटी न।भरता, देवीला अपेक्षित अशाप्रकारे जित्याजागत्या विधवा ताईंना साडीचोळी देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम हा खऱ्या अर्थाने मानवतावादी विचार सरणीच्या परिवर्तनाची नांदी आहे.
हा विचार, ही कल्पना अनेक विषयात पीएचडी घेतलेल्या माणसाच्या डोक्यातही येऊ शकत नाही. तो विचार कर्मयोगीच्या डोक्यात आला व त्यांनी कृतीत उतरवला त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.
या कार्यक्रमाला गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सोबतच जळकापटाचे व तळेगाव दशासर येथील संभाजी ब्रिगेड चे अजय हटवार, सुयोग ठाकरे, ग्रामविकास अधिकारी विलास बिरे, विनोद तीतरे, राजू निस्ताने, विजय पाटील, विशाल ठाकरे, पत्रकार बंधु व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.