नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशनने परिवर्तनाची सुरुवात करत 2019 पासून नवरात्रात देवीला साडीचोळी करून ओटी भरण्याची जी प्रथा आहे. त्या प्रथेला अनुसरून देवीला अपेक्षित असा नवरात्रोत्सव साजरा करत पूजा, विधी, धार्मिक कार्य यांच्यापासून ज्यांना दूर ठेवल्या जाते, त्यांना आधार, प्रेम देण्याऐवजी दुखविल्या जाते.
अशा विधवा ताईंना साडी-चोळी करून त्यांना सन्मानित करत, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून कृतीतून नवरात्रोत्सव साजरा करत देवी तर जगाची पालनकर्ता आहे त्यामुळे देवीला साडीचोळीची अपेक्षा नाही, तर जीवनाचा आधार गमावलेल्या दुःखीकष्टी ताईंना साडीचोळीने सन्मानित करून कृतीतून नवरात्रोत्सव साजरा करावा हा परिवर्तनवादी संदेश कर्मयोगी कडून देण्यात येत आहे आहे.
यावर्षी सुद्धा कर्मयोगी तर्फे 101 विधवा ताईंना साडीचोळी देऊन सन्मानित करण्याचा संकल्प दोन टप्प्यात करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात तळेगाव दशासर अमरावती येथील 40 विधवा ताईंना सन्मानित करण्यात आले तर दुसऱ्या टप्प्यात 17 ऑक्टोबरला आई सभागृह बुटीबोरी नागपूर येथे 61 ताईंना सन्मानीत करत 101 विधवा ताईंना सन्मानित करण्याच्या संकल्पाची संकल्पपूर्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाची विशेषतः म्हणजे व्यासपीठावर कर्तृत्ववान 9 विधवा ताईंना देवींच्या स्वरूपात बसविण्यात आले होते त्यात प्रामुख्याने कल्पना मानकर, स्वरूपा वानखेडे, पदमा लांडे, मीनाक्षी घोडखांडे, प्रतिभा कडू, शालिनी मनोहर, शालिनी आष्टनकर, सुधा लोखंडे, श्रुंखला लाजूरकर या कर्तृत्ववान ताईंचा समावेश होता. या 9 ताईंना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर या 9 देवींच्या हस्ते 61 विधवा ताईंना साडीचोळी देऊन सन्मानित करण्यात आले। हा आनंद सोहळा पाहून सर्व सभागृह भारावून गेले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कल्पना मानकर म्हणाल्या की या कार्यक्रमाची शिस्तबद्ध प्रणाली पाहून व या जगात कोणी इतकं परक्या माणसांना प्रेम देऊ शकते हे पाहून मी अक्षरशः भारावून गेले आहे. खऱ्या अर्थाने विदर्भातील गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचं कृतीतून कार्य कर्मयोगी करत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांनी बोलून दाखविले की आमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी यशस्वी मेहनत घेतली.