नागपुर (महाराष्ट्र): आठ दिवसा अगोदर आसोला सावंगी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथील पूजा देवळे यांनी कर्मयोगी फाऊंडेशनला फोन केला आणि सांगितले की माझ्या पतीचा अपघात झाला आहे. एक शस्त्रक्रिया झाली दुसरी करायची आहे, दर सोमवारला शुअरटेक हॉस्पिटल येथे न्यावे लागते, परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तुम्ही आम्हाला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या व काही आर्थिक मदत कराल का. तेव्हा कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी सांगितले की आमच्याकडे रुग्णवाहिका नाही, मी दुसरीकडून प्रयत्न करतो व लवकरच तुमच्या घरी भेट देऊ.
तेव्हा आपल्या शब्दाला पाळत गणेश स्थापनेच्या दिवशी अपघातग्रस्त व्यक्ती राजुभाऊ महावीर देवळे वय ४३ वर्ष यांना कर्मयोगी फाऊंडेशन कडून भेट देण्यात येऊन परिस्थिती जाणून घेण्यात आली. राजुभाऊ यांचा ऑगस्ट महिन्यात पचमढी वरून येताना अपघात होऊन उजव्या पायाला जबर दुखापत झाली. चारचाकी गाडीवाला त्यांच्या दोनचाकी गाडीला उडवून पसार झाला. तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या काही सहकाऱ्यांनी त्यांना हुसंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. परंतु त्यांनी त्यांचा इलाज न करता आपल्या महाराष्ट्रात घेऊन जा असा सल्ला दिला.
शेवटी त्यांना नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये आणून तुटलेल्या पायाची शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून करण्यात आली. या सर्व परिस्थितीला घरात आठरविश्व दारिद्र्य असताना त्यांची पत्नी पूजा ताई मोठ्या हिमतीने तोंड देत होती, त्यानंतर त्यांना सागण्यात आले की पायाची कटोरी सरकली आहे, ती गुजरात वरून बोलावून दुसरी शस्त्रक्रिया केली तरच हे पायावर उभे राहू शकणार. अशा परिस्थितीत त्यांचे सर्व मित्र व आप्तजन जवळ यायला सुद्धा तयार नव्हतें. त्यात परिस्थिती हालाखीची असून दररोज औषधोपचाराचा खूप खर्च येत आहे स्वतःचे घरपण नाही. होते ते रस्त्याच्या रुंदीकरणात गेले व त्यातून मिलेलेल्या ३ लाख रुपयातून छोटासा प्लॉट घेतला व त्या आता भाड्याने राहतात.
त्यात दवाखान्यात कमीत कमी स्वतःचा एक लाख रू खर्च होऊन गेला आहे. आता त्यांच्याकडे रोजच्या औषधपाण्याला पण पैसे नाही. पूजाताई २०० रुपये रोजाने शेतमजुरीला जातात, कधी काम असतं कधी काम नसतं, दोन छोटी मुलं त्यांच्या शिक्षणाचा खर्च, पुजाताई समोर संकटाचा पहाड उभा झाला आहे. याही परिस्थितीत त्यांनी दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी त्या जीवाचं रान करत आहे ही सर्व परिस्थिती जाणून कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे माणुसकी जपत १० हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. यावेळी या दोन्ही पती पत्नींनी सांगितले की संकटाच्या काळात आमच्या मदतीला कोणीही आले नाही अशावेळी कर्मयोगी आमच्या मदतीला धावून आले त्याबद्दल त्यांनी अश्रू नयनांनी धन्यवाद मानले.
यावेळी कर्मयोगी फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज ठाकरे म्हणाले की ज्या प्रकारे लोकं गावागावात धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी वर्गणी जमा करतात त्याचप्रमाणे जर दुखीकष्टी व संकटात सापडलेल्या लोकांसाठी सुद्धा थोडीफार दानराशी एकत्र केली तर ईश्वराला अपेक्षित कार्य होईल, आज तीच मदत करत गणपतीरायाला अपेक्षित गणेशोत्सवाची सुरुवात कृतीतून करत हे ही संकटाचे दिवस जातील हा विश्वास देत प्रेमाचा व मदतीचा धीर देवळे परिवाराला देण्यात आला .यावेळी कर्मयोगी परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती.