नागपुर (महाराष्ट्र) : जागतिक कामगार दिन हा कामगार वर्गासाठी सर्वात मोठा उत्सव परंतु आजच्या स्वार्थी जगात कामगार वर्गाला व भांडवलदार वर्गाला मोठं करण्यासाठी ज्या कामगारांनी आपले प्राण गमावले. त्यांच्याप्रती कृतज्ञत व्यक्त करत कामगार दिन साजरा करण्यासाठी कामगार, भांडवलदार, ठेकेदार कोणीही समोर यायला तयार नाही, परंतु गेल्या तीन वर्षांपासून कर्मयोगी फाऊंडेशन आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे कृतीतून कामगार दिन साजरा करत आहे.
यावर्षी सुद्धा कर्मयोगीने मेट्रो चौक बुटीबोरी येथे कामगार दिनाचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते कंत्राटी कामगारांच्या गरजवंत २ मुलींना शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. कामगार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५ महिला कामगारांना सन्मानित करण्यात आले. सोबतच उन्हातान्हात काम करणाऱ्या ऑटो चालकांना टोपी वाटप करून मायेची सावली देण्यात आली व ५ हजार लोकांना अन्नदान करून कामगार दिन कृतीतून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतर्विद्या अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, उदघाटक कामगार नेते यजेंद्रसिंग ठाकूर, प्रमुख उपस्थितीमध्ये कामगार नेते गजानन गावंडे व मोहन खरबडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ प्रशांत कडू म्हणाले की इतक्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात जेथे जवळपास १ लाख कामगार काम करतात त्या क्षेत्रात कामगारांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मयोगी ही एकमेव संस्था कामगार दिन साजरा करत आहे ही अतिशय सराहनिय बाब आहे, त्यांचे हृदयापासून मी आभार व्यक्त करतो.
समोरचे चित्र पाहता कामगारांनी एकत्र येऊन आता संघर्षाची वाट धरली पाहिजे व ते काम कर्मयोगी अतिशय चांगलं करू शकते त्यामुळे सर्वानी मोठ्या प्रमाणात कर्मयोगीला साथ दिली पाहिजे असे ते यावेळी आवर्जून म्हणाले. या कार्यक्रमाला कामगार वर्ग व कर्मयोगी परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.