नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने दुःखीकष्टी गरजवंत लोकांच्या हाकेला धावून जाणारे फाऊंडेशन आहे. त्यांचा प्रत्येक उपक्रम हा नाविन्यपूर्ण कल्पकतेतून आलेला व कृतीतून साकारत इतरांना प्रेरणा देणारा असतो. दसरा सणाचे शुभ मुहूर्त साधून अनेक लोक आपल्या घरी या दिवशी गाडी, टीव्ही, फ्रीज या सारख्या नवीन वस्तू आणण्यास प्राधान्य देतात. याच गोष्टीला अनुसरून कर्मयोगीने नागपूर मधील दवलामेटी येथे परिस्थितीशी सतत संघर्ष करीत असलेल्या प्रिन्स व अक्षरा या बहीण भावासाठी नवीन सायकल घेऊन पोहोचले व सोबतच त्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला.
वस्तुस्थिती अशी आहे की काटोल येथील दीपक गायकवाड हे आपले पोट भरण्यासाठी नागपुरला आले. येथे येऊन गवंडी काम करत असतांनाच त्यांचे २००६ मध्ये जयाताई यांच्याशी लग्न झाले. दोघेजण दवलामेटी येथे आबादीच्या जागेत झोपडी करून राहू लागले. या दरम्यान या झोपडीत प्रिन्स व अक्षरा ही दोन अतिशय हुशार व गुणी मूलं जन्माला आली. हातावर आणून पानावर खाणे सुरू असतानाचं नियतीने डाव साधला व २०१८ मध्ये एकाएकी दीपक यांच्या दोन्ही किडण्या निकामी होऊन ते स्वर्गवासी झाले.
वडिलांचे छत्र हरवले असताना आई समोर आली व वाडी नगरपरिषद मध्ये कामाला लागली. परंतु काळाने आणखी डाव साधला व एक दिवस २०२२ मध्ये दुसऱ्याच्या गाडीवर कामाला जात असतांना जयाताई गाडीवरून पडल्या व तेवढ्यातच त्यांच्या पायावरून टाटा एक्स गेला व होत्याच नोव्हतं करून टाकलं, ताईचे महात्मा फुले शासकीय योजनेतून पाचवेळा शस्त्रक्रिया झाली परंतु ताई कमरेतून पूर्णपणे निकामी झाल्या वॉकर शिवाय चालू सुद्धा शकत नाही. हा प्रिन्स व अक्षरावर नियतीने केलेला सर्वात मोठा आघात होता.
अशाही परिस्थितीत शिक्षणाची प्रचंड जिद्द असणारी मुलं आपल्या आईची दिनचर्या करत सकाळी स्वयंपाक करून घरची सर्व कामे करून दहाव्या वर्गात इंग्रजी माध्यमात शिकत असलेला प्रिन्स व नवव्या वर्गात इंग्रजी माध्यमात शिकत असलेली अक्षरा दोन किलोमीटर पायदळ शाळेत जातात. घरात कमावणार कोणीच नाही बाजूलाच रहात असलेली कविताताई व कामठी येथील मावशी दर महिन्याला थोडीफार जी मदत करतात त्यातून गायकवाड परिवाराचा रोजचा संघर्षमय जीवनप्रवास चालतो.
धम्मचक्र प्रवर्तनच्या दिवशी घरात भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असतांना त्यांना फुल अपर्ण करण्यासाठी ५ रुपये सुद्धा जवळ नाहीत. इतके अठराविश्व दारिद्र्य असताना कोठेही या दोन भावांचे शिक्षण थांबू नये म्हणून जेव्हा कर्मयोगी नवीन हिरो सायकल घेऊन पोहोचले व दहा हजार रुपयांची मदत देऊन तुमच्या पाठीशी कोणीतरी आहे याची जेव्हा जाणीव करून दिली तेव्हा जयाताईंनी सातत्याने आपल्या अश्रूंच्या वाटा मोकळ्या करून दिल्या व म्हणाल्या या प्रकारे मदत घेऊन आजपर्यंत आमच्याकडे कोणीच पोहोचले नाही. प्रिन्स व अक्षराच्या डोळ्यातील अश्रु व आनंद पाहून उपस्थित सर्व लोक गहिवरून गेले होते. खरच कर्मयोगीने दसरा व धम्मचक्र प्रर्वतन दिन कृतीतून साजरा करत मानवतेची नवीन शिकवण दिली.