नागपुर/हैदराबाद: कर्मयोगी फाऊंडेशन हे कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार सरणीनुसार बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर ग्रामीण भागात सतत कार्यरत आहे. कर्मयोगीने आता ज्या भागात शासकीय किंवा खाजगी अशी कोणतीच आरोग्य सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर राबवून ती देण्यास सुरुवात केली आहे.
१५ जून ते १८ जून या दरम्यान कर्मयोगीने आरोग्य शिबीरांची श्रुखंला राबविली. १५ जूनला किन्हाळ माकळी येथे, १६ जूनला सोनूर्ली येथे व १८जूनला पिपालधारा येथे आरोग्य शिबीर राबविण्यात आले. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्या मधील ही गावे परंतु येथे आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, ही बाब लक्षात घेवून सकाळी ११ ते १ या वेळेत निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.
या शिबिरात डॉ. रंजना वाणे प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ, डॉ. अमित रामटेके अस्थीरोग तज्ञ, डॉ. आकाश गौरखेडे अस्थीरोग तज्ञ, डॉ. आशिष सतिसेवक बालरोग तज्ञ व डॉ अक्षय मून जनरल फिजिशियन या तज्ञ मंडळीनी सेवा दिली. अनेक रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात औषधी मोठ्या प्रमाणात निशुल्क देण्यात आल्या.
या आरोग्य शिबिरांना किन्हाळ माकळीच्या सरपंच चंदा चिकनकर सोनूर्लीच्या सरपंच कल्पना उलमले, पिपलधाराच्या सरपंच नलीनी शेरकुरे, सागर धांडे, श्रीकांत चिकनकर कृष्णाजी उलमाले, पुरुषोत्तम शेरकुरे, समीक्षा बडवाईक, सुवर्णा वडे, गीता सरोदे, मनीषा नागोसे, स्नेहल नागोसे, वसंता डायरे व श्री मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे व्यवस्थापकीय संचालक गजानन राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.