नागपुर: कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत आहे. कर्मयोगीचे कार्य जवळपास १६५ गावात कृतीतून पोहचले आहे व त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे गावागावातील अनेक तरुण, तरुणी, ज्येष्ठ मंडळींनी कर्मयोगी फाऊंडेशन मध्ये कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या सर्व उत्साही नागरिकांच्या इच्छेला अनुसरून कर्मयोगी अभ्यासिका बुटीबोरी येथे संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या संघटन मेळाव्यात माझा जन्म कशासाठी. जीवनाचा प्रवास सामान्य व्यक्तिमत्वाकडून असामान्य व्यक्तिमत्वाकडे नेणे. आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविणे. गावातील दु:खीकष्टी लोकांच्या हाकेला धावून जाणे. सत्य, सातत्य, समर्पण व शिस्त या तत्वावर कार्य करणें. हे विषय संघटन मेळाव्यात ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरचे आंतरविद्या अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, उदघाटक प्रबोध अकॅडमी बुटीबोरीचे संचालक डॉ. प्रबोध येळणे मार्गदर्शक कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे कार्याध्यक्ष वर्षा पारसे संघटन प्रमुख नासीर शेख ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
अध्यक्षीय भाषणात प्रशांत कडू म्हणाले की साक्षात मानवतेचं कार्य कर्मयोगी करत आहे. कर्मयोगी जनकल्याणाचे विविध उपक्रम राबवित आहे. आतापर्यंत ८५ गावात प्रेमरूपी अभियान राबवत घरोघरी जाऊन त्यांचे सुखदुःख जाणून खऱ्या अर्थाने आजपर्यंत जे कोणीही केलं नसेल ते मोठ्या प्रमाणात लोकांना प्रेम देण्याचं काम कर्मयोगी निरंतर करत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक गरजूच्या हाकेला धावून जाण्याच काम कर्मयोगी करत आहे. त्यामुळे कर्मयोगी ही संस्था लवकरच जगप्रसिद्ध होणार आहे. कारण जगाने दखल घ्यावी असे कर्मयोगीचे कार्य आहे.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना पंकज ठाकरे म्हणाले की लोकांना भरभरून प्रेम देणे, त्यांना आनंद देणे हे करताना मोठया प्रमाणात आनंद लुटणे यासाठीच आपला जन्म झाला आहे. विशेषतः प्रत्येक माणसाचा जन्म हा महान कार्य करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे या सर्व महान लोकांचं संघटन उभारून कर्मयोगीला विदर्भात मोठ्या प्रमाणात कार्य उभारायचे आहे. वर्षा पारसे व नासिर शेख यांनी आम्ही कर्मयोगीशी कसे जुळलो यावर आपले मत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीच्या नवनवीन योजनाबद्दल तुलशीदास भानारकर यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाला विशेषतः नागपूर व हिंगणा तालुक्यातील तरुण मंडळी उपस्थित होती. सर्वांनी कर्मयोगी सोबत कार्य करून आम्ही आमचे गाव आदर्श करू शकतो असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा ठाकरे, प्रास्ताविक नितेश आत्राम व आभार प्रदर्शन शितल बारेवार यांनी केले. संघटन मेळावा यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवाराने यशस्वी मेहनत घेतली.