भारतीय संस्कृतीत महिलांना नेहमी श्रेष्ठ आणि आदराचे स्थान आहे. पण आपल्या या देशात अनेक वर्षांपासून त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा काही थांबता थांबेना. याबाबत कवयित्री सूरजकुमारी गोस्वामी यांनी महिलांचे प्रश्न, त्यांचा होणारा कोंडमारा, त्यांच्या वरील होणारे अन्याय, अत्याचार, त्यांना आखून दिलेली जबाबदारिची चौकट, चूल आणि मूल या सर्व जाचक अन अत्यंत क्रूर वागणुकीला कंटाळून त्यांनी विद्रोही बाणा कवितेतून पेरला आहे. त्यांच्या ‘तरी आम्ही बोलत नाही’ या पहिल्याच कवितासंग्रहात त्यांनी अन्यायाला वाचा फुटावी, वास्तविकता समाजासमोर मांडावी अन महिलांना जाचक त्रासातून मुक्तता व्हावी तसेच मुक्त संचार करता यावा यासाठी आग्रही असलेल्या वैचारिक वृत्तीच्या कवयित्री सुरजकुमारी गोस्वामी यांनी त्यांचा हा कवितासंग्रह त्यांच्या लिखाणाने समृद्ध केला आहे.
लहानपणापासूनच लिखाणाचा छंद असलेल्या कवयित्री सुरजकुमारी यांना स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार याची चीड यायची याबद्दल त्या लिहू पाहत होत्या पण तसे पोषक वातावरण त्यांना मिळाले नाही. लग्नानंतर घरसंसार सांभाळत, सुख दुःखाला गोंजारत त्यांनी फावल्या वेळेत त्यांच्या या कविता लिहीत समाजमनाचा कानोसा घेतला आहे.कवयित्री ला सासरी तेलगू भाषा म्हणजेच अमराठी वातावरण जरी असले तरी त्यांचे मराठी वरील प्रेम अपार आहे हे त्यांच्या या कवितासंग्रहातुन दिसून येते. कवयित्री सुरजकुमारी यांच्या लिखाणाचा प्रमुख गाभा म्हणजे स्त्री जीवन, प्रेम, अन्याय, अत्याचार विरोधी प्रवृत्ती, बाईपणाचे जगणे, लेकीबाळीबद्दल असलेली जागृतता तसेच समाजात घडत असलेल्या बलात्कार, विनयभंग, छेडाछाडी याबाबतची चीड हे आहे. या कविता संग्रहात एकूण ७२कविता असून सर्वच कविता या समाजमन हेलावून टाकणाऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन त्या आपल्या कवितेतून विद्रोहाच्या ज्वाला पेरताना दिसतात.आत्महत्या करणाऱ्यांना त्या प्रेरणा देत त्यांना जीवनाचे महत्व समजावून सांगताना दिसतात.
हे पण वाचा-
‘वेळ नाही’ या कवितेत कवयित्री धावपळीच्या जीवनात लेकाला आपल्या आईवडिलांच्या अंत्यविधीला येण्यास वेळ नाही. ही शोकांतिका मांडतात. तर ‘राजे जन्माला या’ या कवितेत राजकारण्यांचा थयथयाट, माजलेली अराजकता अन जाती धर्मात माजलेली दुफळी, आया बहिणीवरील अत्याचार वाढलेला आहे यावर मात करण्यासाठी, संस्कारमय राष्ट्र घडवीन्यासाठी राजे जन्माला या अशी विनवणी कवयित्री करतात. ‘बाकी सारे झूट’ या कवितेत ते म्हणतात..
गोमूत्र शिंपडून कोणी शुद्ध होतो का रे?
असे चिंतनात बसून कोणी बुद्ध होतो का रे?
यामधून ते सांगू इच्छितात की गोमूत्र शिंपडल्याने कोणी शुद्ध होत नसते तर नुसत्या चिंतन अन मनन करण्याने कोणी बुद्ध होत नसते. आतले पाप नष्ट करण्याचे काम स्वतः करणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा सोडून श्रद्धा बाळगावी असा विज्ञानवादी विचार या कवितेतून देतात.
‘कसला महिला दिन’ या कवितेतून त्या महिला दिन साजरा करणाऱ्यांना चांगलीच चपराक देतात. एका दिवसासाठी महिला दिन साजरा करून काहीच होत नाही तर महिलांवरील होणारे अत्याचार झालेच पाहिजे नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कधी हुंड्या साठी तिला मारलं जातं तर कधी क्रूरतेने जाच केला जातो हे कुठेतरी थांबायला हवे. असा सूर कवयित्री या कवितेतून काढतात. ‘तिची व्यथा’ या कवितेतून त्या समस्त स्त्री वर्गाची व्यथा मांडताना त्या म्हणतात की या माणसांच्या जंगलात तिने जगायचं कसं? विधवा महिलांनी विकट हसणाऱ्या लांडग्याच्या नजरेला भिडायचं कसं? वासनांध नराधमांच्या पिसाळलेल्या नजरेतून गुलाबाने पाकळ्यांना जपायचं कसं? असा सवाल त्या करतात.
‘मुखवटे’ या गझलसदृश्य कवीतेतून ते सांगू इच्छितात की…
बघा सोडला किनारा मी आज ओळखीचा
घाबरून वादळाला मागे फिरायचे का?
ओळखीचे किनारे सोडून आता आपल्या ध्येय्याच्या वाटेवर जात असताना यात जर वादळ आल्यास त्याला न जुमानता पुढेच चालत राहावे आपले ध्येय्य नक्कीच साध्य होईल. ‘आईचे मुलीस पत्र’ या कवितेत एका आईचे आपल्या मुलीच्या काळजीने पिळवटलेले हृदय सांगताना त्या लाडक्या लेकीला म्हणतात की जवानीच्या चौकटीत उभी असताना तुला बाईपणाचे बाळकडू प्यावेच लागेल.जीवनाच्या शर्यतीत पुढे जाताना किती नजरा भिडतील तुला त्यांना दुर्लक्षित करून समोर चल. होणाऱ्या अत्याचाराला जवाब द्यायला शिक, कुणाच्या कपाळावर लिहून नसतं की हा नराधम आहे त्यामुळे सर्वांपासून सावध रहा, त्यांना ओळखायला शिक. अशा सूचना ही त्या प्रत्येक मुलीला देतात.
‘तरी आम्ही बोलत नाही’ हा कविता संग्रह सर्वांना वाचनीय असाच आहे. कारण यातून अन्याय अत्याचाराला भिडन्याचे सामर्थ्य अन नवी प्रेरणा मिळते. या कविता संग्रहात कवयित्रीनी आपल्या कवितातून संबंध समाज कसा आहे आणि ते ढवळलेले समाजमन यात कसे वागायचे हे सांगितले आहे. कधी मुक्त कविता तर कधी अभंग, कधी गझल सदृश्य कविता तर कधी अलंकारित कवितातून त्या आपले विचार मांडताना दिसतात.
‘तरी आम्ही बोलत नाही’ या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी कवितासंग्रहाला अगदी साजेशे असेच साकारलेले आहे. गझलकार किरणकुमार मडावी यांची मलपृष्ठावरील पाठराखण ही तितकीच ताकतीची आहे. त्यांचा हा कवितासंग्रह नक्कीच समाजाला जागृत करण्याचे काम करेल यात शंका नाही. त्यांच्या लेखणीची तळमळ ही अत्यंत अगतुक होऊन बोलत आहे.समस्त स्त्री वर्गाचे नेतृत्व करत त्यांना सावध होण्याचा इशारा हा कवितासंग्रह करत आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा कवितासंग्रह नक्कीच वाचावा असाच आहे. कवयित्री सूरजकुमारी गोस्वामी यांच्या या कवितासंग्रहाचे मनस्वी स्वागत व त्यांच्या पुढील लिखानास खूप खूप शुभेच्छा.
पुस्तक – तरी आम्ही बोलत नाही
कवयित्री – सूरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद
परीक्षक – विजय वाठोरे (साहिल )
साहित्यिक तथा पत्रकार
हिमायतनगर नांदेड
9975593359