नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे जीवन योद्धा (विधवा) ताई व सौभाग्यवती ताईंसाठी आगळावेगळा परिवर्तनवादी हळदी कुंकू कार्यक्रम वाणात प्रेमाचा व आनंदाचा गोडवा देण्यासाठी आई सभागृह बुटीबोरी येथे आयोजित करण्यात आला. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण तीळ गूळ घ्या गोड गोड बोला असं आमच्याकडे वर्षानुवर्षा पासून म्हटल्या जाते, परंतु आजही विधवा स्त्रियांना या सणापासून दूर ठेवल्या जाते.
खर तर या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आधार व प्रेम द्यायला हवं त्यासाठी गरज आहे ती परिवर्तनवादी संक्रांत सण कृतीतून साजरा करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशनने आत्मीयतेने या विधवा ताईंना एका ठिकाणी बोलावून त्यांच्या जीवनात प्रेमाचा, आनंदाचा व मदतीचा दीप लावण्यासाठी विविध उपक्रम राबवित सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदवन वरोराचे विश्वस्त सुधाकर कडू उदघाटक प्रसिद्ध वऱ्हाडी कवी अनंत राऊत तर प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. प्रशांत कडू, वृंदा ठाकरे, सुष्मा कडू, रिद्धी देशमुख, अर्चना देवतळे, देविदास लाखे, पार्वती महंतो, सुनीता गांधी, सुजाता भोंगाडे ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
जवळपास ४०० जीवन योद्धा व सौभाग्यवती महिलांना वाणात प्रेमाचा व आनंदाचा गोडवा देत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. महिलांच्या उन्नतीसाठी संविधान जागरण हे नाटक नागपूर मित्र परिवाराकडून सादर करण्यात आले. या कार्यक्रमाची विशेषतः म्हणजे या कार्यक्रमाचे उदघाटक प्रसिद्ध वऱ्हाडी कवी मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा फेम अनंत राऊत यांनी महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन करत आपल्या सदाबहार कवितांची मेजवानी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की कर्मयोगीचे इतके भव्यदिव्य व निस्वार्थी कार्य पाहता विदर्भात गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यानंतर सामाजिक कार्यात कर्मयोगीचं नाव घेतल्या जाईल हे मी खात्रीपूर्वक सांगतो असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर कडू म्हणाले की मी कर्मयोगीला काय मार्गदर्शन करणार, मार्गदर्शना पलीकडले त्यांचे कार्य आहे. त्यामुळे विदर्भात कर्मयोगी ही संस्था दुःखीकष्टी लोकांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत आहे हे पाहून मला आनंद होत आहे. या कार्यक्रमाला आलेल्या महिला त्यांचे स्वागत ते जेवणा पर्यंतची व्यवस्था पाहून भारावून गेल्या होत्या ते त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दाखवून दिले.
या कार्यक्रमाला दिनकर कडू ज्ञानेश्वर रक्षक, नितीन वरणकर, वामन कोहाड, चंद्रभान राऊत विविध गावचे सरपंच, उपसरपंच व जवळपास ३० गावावरून महिला मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी परिवाराने मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.