मानवतावादी उपक्रम चला वृध्दांचे डोळे होऊया
२०२४ मध्ये नेत्र तपासणी करून ५ हजार वृध्द मंडळीना निशुल्क चष्मे देण्याचा संकल्प
नागपुर: कर्मयोगी फाऊंडेशन हे गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीवर बोलते नव्हे तर कर्ते व्हा हे तत्व वापरून ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात नवसंजीवनी देण्याचे कार्य करत आहे.कर्मयोगी फाऊंडेशनने आतापर्यंत २०७ गावात मदतीचा व प्रेमाचा दीप लावला आहे.
विदर्भातील गोरगरीब, दुखीकष्टी जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल व्हावा यासाठी त्यांनी २०२४ मध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे संकल्प हातात घेतले आहेत. त्यांपैकी चला वृध्दांचे डोळे होऊया या शीर्षकाखाली नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर राबवत ग्रामीण भागातील ५ हजार वृद्धांना निशुल्क चष्मे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संकल्प २०२४ साठी घेण्यात आला आहे.

या संकल्पाची सुरवात ९ जानेवारी २०२४ रोज मंगळवारला कर्मयोगी फाऊंडेशन, ग्रामपंचायत बोथली, लता मंगेशकर हॉस्पीटल, समता फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत भवन बोथली तालुका जिल्हा नागपूर येथे करण्यात आली. या शिबिरात ९० व्यक्तीची तपासणी करण्यात आली, त्यातून ११ रुग्ण मोतीबिंदु असल्याचे आढळले आणि ५२ मंडळीना चष्माचें वाटप करुन गावकरी मंडळीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. या सर्व मोतीबिंदू असणाऱ्या व्यक्तींची शस्त्रक्रिया येत्या दोन दिवसात लता मंगेशकर रुग्णालय हिंगणा येथे निशुल्क करून देण्यात यईल. या शिबिरासाठी कपिल चव्हाण, सलोनी श्रीमाली या तज्ञ डॉक्टर मंडळीनी सेवा दिली.

यावेळी बोथलीच्या सरपंच कविता नामुर्ते उपसरपंच अरुण वानखेडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर नामुर्ते ही मंडळी प्रामुख्याने उपस्थित हीती. शिबिर यशस्वी होण्यासाठी संदीप हेडाऊ, घनश्याम समर्थ व कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.
