कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली हवी : डॉ सुभाष चौधरी
स्वतःच्या खिशातून पैसा काढून कार्य करणारी एकमेव संस्था म्हणजे कर्मयोगी फाऊंडेशन: डॉ बबनराव तायवाडे
जागतिक सायकल दिनाला २५ सायकलचे वाटप
नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशनन ने आई वडील नसलेल्या मुलींना २०२२ मध्ये १५१ सायकलचे वाटप केले आहे. २०२३ मध्ये सुद्धा आई वडील नसलेल्या मुला- मुलींसाठी ५१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाचे दोन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी या संकल्पाचा पहिला टप्पा जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधत दि. ३ जूनला अमेय सेलिब्रेशन बुटीबोरी येथे विधवा महिलांना प्रेमरूपी आधार देऊन विशेषतः आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुला-मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत २५ सायकलचे वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, उदघाटक ओबीसी महासंघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रमुख उपस्थितीमध्ये कॅलरीस इंडिया लिमिटेडचे इंडस्ट्रीयल ऑपरेशन डायरेक्टर सत्येंद्र कुमार, आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, प्रवीण देवतळे ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष चौधरी म्हणाले की आजची शिक्षण पद्धती ही मालक नव्हे तर मोठ्या प्रमाणात नोकर तयार करत आहे. आम्हाला जर मालक बनायचे असेल तर कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली हवी. येत्या ४ ऑगस्टला नागपूर विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गावाकडे चला हे अभियान आम्ही राबवित तळागाळातील माणसापर्यंत पोहोचणार आहोत, कर्मयोगीचं कार्य बघता या कार्यात आम्हाला कर्मयोगी फाऊंडेशनला सोबत घेऊन काय कार्य करता यईल यावर सुद्धा आम्ही विचार करणार असे ते आवर्जून म्हणाले.

यावेळी उदघाटक डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की कर्मयोगीच्या कार्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी. मी तर कर्मयोगीच कार्य पाहून आश्चर्यचकित झालो आहे. ज्या लोकांच्या घरी लाख, दहा लाख, पंधरा लाख पगार येतो त्यांचं ठीक आहे. परंतु अतिशय तुटपुंज्या पगारातून ही कामगार मंडळी इतकं मोठं काम करते ते करण्यासाठी ५६ इंचाची नव्हे तर १७२ इंचाची छाती पाहिजे. कर्मयोगी सत्य, सातत्य, समर्पण, शिस्त या तत्वावर बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वानुसार कार्य करत आहे, त्यामुळे या संस्थेच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही.

यावेळी आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले की कर्मयोगीचे अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी आपल्या श्रमिक कामगारांमध्ये देवत्व निर्माण केले आहे. आज जरी नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाव दिले गेले आहे. परंतु तुकडोजी महाराजांच्या विचार सरणीवर विद्यापिठाचं खरं काम पंकज ठाकरे करत आहे. त्यामुळे त्यांच कार्य बघता त्यांची निवड तुकडोजी महाराज अभ्यासक्रमावर करण्यात यावी, असे ते आवर्जून म्हणाले.

यावेळी या निराधार महिलांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आजच्या कार्यक्रमात आम्हाला व आमच्या मुलांना जो मानसन्मान मिळाला तो आम्ही कधीच विसरणार नाही. बऱ्याच दिवसानंतर आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले ते पाहून आज मनाला समाधान वाटत आहे. तसेच हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक लोक दूरदूरच्या गावावरून आले होते.

त्यात प्रामुख्याने अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सोबतच डॉ. प्रशांत कडू, प्रकाश नागपुरे, विनायक इंगळे गुरुजी, विनोद तितरे, विजय पाटील, गजानन ढाकुलकर, नारायण भिसे, सुनील खोब्रागडे, संदीप डेकाटे, सतीश शेळके, राजू गावंडे, गजानन गावंडे, भोजराज धकाते, ही प्रतिष्ठित मंडळी व मोठ्या प्रमाणात महिला व बालक मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.