कर्मयोगी वैष्णवीचे वैद्यकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणार
या वर्षात आईवडील नसलेल्या १० मुलांचा ५० टक्के शिक्षणाचा खर्च कर्मयोगी उचलणार.
नागपुर: सावळी बिंबी ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील वैष्णवी आत्माराम लिडबे ही दोन वर्षाची असतानाच तिचे बाबाचे एका अपघातात निधन झाले. तेव्हा तिची लहान बहीण सहा महिन्यांची होती. कमाईचे घरी कोणतेच साधन नसताना आईने मुलींचे शेतमजूरी करून शिक्षण केले. वैष्णवी या वर्षी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने आईच्या होणाऱ्या हालअपेष्टा पाहून लवकरात लवकर नौकरी मिळावी यासाठी बीएससी नर्सिंगला जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा यासाठी कमीतकमी २ लाख खर्च येणार हे ऐकून आईने तिला शिक्षण थांबवायला सांगीतले. कारण आई २०० रुपये रोजाने शेतमजुरी करायला जाते.कधी काम राहते तर कधी नाही. त्यात घर चालविणे व दोन मुलींचे शिक्षण करणे हे शक्य नसल्यामुळे आईने ही गोष्ट कानावर घेतली नाही.
आता आपले शिक्षण थांबणार या विचारात असताना तिला आपल्या लहान बहिणीला शिक्षणासाठी सायकल दिलेल्या कर्मयोगी फाऊंडेशनची आठवण झाली व लगेच तिने फोन केला तेव्हा त्यांनी तिला इतरांकडून मदत घेण्यास सांगितले, परंतु वैष्णवीला अपेक्षित मदत कोणीच केली नाही. तेव्हा आठ दिवसानंतर कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी फोन करून तुझा व तुझ्या आईच्या जीवनातला संघर्ष हिरावून न घेता कर्मयोगी फाऊंडेशन तुझ्या शिक्षणाचा ५० टक्के खर्च उचलायला तयार आहे. पुढील तीन वर्षात टप्प्या टप्प्याने १ लाख रुपये करून देणार हे ऐकताच वैष्णवीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
कर्मयोगी संघटन मेळाव्यात आईला व वैष्णवीला बोलावून ११ हजार रुपयांचा धनादेश वैष्णवीला देण्यात आला. यावेळी वैष्णवी म्हणाली कर्मयोगी फाऊंडेशनने माझ्या शिक्षणाचा आज जरी ५० टक्के खर्च उचलला असला तरी मला ते कोठेच कमी पडू देणार नाही असा पूर्ण विश्वास आहे. एका आठवड्यामध्ये माझी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज सावंगी मेघे येथे अॕडमिशन झाली. आता माझं थांबलेलं शिक्षण पूर्ण होत आहे. माझ्या जीवनाला गती मिळणार आहे. मी शिक्षणामध्ये उंच भरारी घेणार आहे. माझं शिक्षणाच स्वप्न पूर्ण होत आहे हे पाहून मला आणि माझ्या आईला खूप आनंद होत आहे.
खरंच कर्मयोगी फाऊंडेशनने माझ्यासाठी एका देवदूताप्रमाणे येऊन मला मदत केली. जिथे नातेवाईकांनी साथ सोडली तिथे कर्मयोगी फाऊंडेशनने साथ दिली. माझ्या परिवारासोबत आज महाराष्ट्रातील एकमेव कर्मयोगी फाऊंडेशन खंबीरपणे उभे आहे. त्याबद्दल मी अगदी मनापासून संपूर्ण कर्मयोगी परिवाराचे धन्यवाद मानतो व ठाम निश्चय करते की मी स्वतः सक्षम झाल्यानंतर माझ्यासारख्या आईवडिलांचे छत्र हरविलेल्या व अनाथ मुलामुलींचे शिक्षण पूर्ण करण्यास सहकार्य करेल.
यावर कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की सतत कार्य सुरू असल्यामुळे आमच्याकडे पैसेच नव्हतें, तेव्हा ही खंत मी आमच्या कर्मयोगीशी जुळलेले एक मोठं व्यक्तिमत्त्व आहे त्यांना बोलून दाखवली व त्यांनी लगेच वैष्णवीच्या शिक्षणाला आपण हातभार लावू असा होकार दिला. त्यामुळे हे शक्य झालं. आपल्या विदर्भात विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या संस्था नसल्यामुळे अनेक मुलांना शिक्षण सोडून द्यावे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अनेक संस्था व बरीच दानशूर मंडळी आहेत ती अशा मुलांच्या खंबीरपणे पाठीशी राहतात. त्यामुळे त्या भागातील मुले आमच्या मुलांपेक्षा बरीच समोर आहे.
आम्ही सुद्धा निर्धार केला आहे की या वर्षात कोणाचाही संघर्ष हिरावून न घेता तो कायम ठेवत या वर्षात १० आईवडील नसलेल्या मुलांचा ५० टक्के शिक्षणाचा खर्च उचलून त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेऊ त्यासाठी विदर्भातील अनेक मंडळी कर्मयोगीला मोठ्या प्रमाणात मदत करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कर्मयोगी फाऊंडेशनच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.