नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाउंडेशन तर्फे २०२१ ते २०२३ दरम्यान अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या, पतीचे छत्र हरवलेल्या जीवनयोद्धा ताईंना आत्मनिर्भर करण्यासाठी १०३ शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले आहे. २०२४ मध्ये सुद्धा कर्मयोगीने १०१ शिलाई मशीन वाटपाचा संकल्प जीवनयोद्धा ताईंसाठी केला आहे.
या संकल्पाचे चार टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे. या संकल्पाचा २५ शिलाई मशीन वाटपाचा पहिला टप्पा जागतिक महिला दिनाचे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधत, सप्तखंजेरी वादक इंजी. पवन दवंडे महाराज यांच्या भव्य समाज प्रबोधनात १० मार्च ला आई सभागृह बुटीबोरी येथे २५ जीवनयोद्धा ताईंना शिलाई मशीन देत जागतिक महिला दिन कृतीतून साजरा करत या दुःखी कष्टी जिवनयोद्धा ताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवित संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अमरावतीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, उदघाटक माजी मंत्री सुनील केदार, प्रमुख उपस्थिती मध्ये गिरीश पांडव, कुंदा राऊत, तनविर मिर्झा, कृपाल भोयर, अनिल कानेकर, गायत्री हुसुकले, गुणेश्वर आरीकर ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर विराजमान होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात संगीता ठाकरे म्हणाल्या की कर्मयोगीने अदभूत कार्य उभारले आहे. प्रत्येक कार्य ते आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या ब्रीद वाक्यानुसार कृतीतून करतात ही त्यांची सर्वात मोठी ओळख आहे. त्यांचे शिस्तबद्ध नियोजन पाहून मी अक्षरशः भारावून गेले आहे. उदघाटक सुनील केदार म्हणाले की हा देश राष्ट्रभक्तीतून उभा राहला आहे.
राष्ट्रभक्तीचे हेच गुण मला आज कर्मयोगी मध्ये दिसत आहेत. जीवनयोद्धा ताईंना जागतिक महिला दिनाला शिलाई मशीन देऊन तो साजरा करणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी येथे साजरा केला आहे. ग्रामीण भागात कर्मयोगीने मोठे कार्य उभारले आहे. त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे आम्ही त्यांच्या सोबत सदैव राहू असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.
या कार्यक्रमाच्या लाभार्थी जिवन योद्धा ताईंनी आपल्या अश्रूंना मोकळे करत आपल्या भावना प्रकट करत सांगितले की आजपर्यंत आमच्यासाठी इतका सुंदर कार्यक्रम कोणीही आयोजित केला नाही. स्वागतापासून ते जेवणा पर्यंतची आत्मीयता पूर्वक व्यवस्था पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहे.
या कार्यक्रमाला दिनकर कडू, प्रभाकर, देशमुख, देविदास लाखे विनायक इंगळे, संजय चिकटे, प्रकाश नागपुरे, राजू गावंडे, अमजद शेख प्रमोद ठाकरे, सुनील खोब्रागडे, अनिल ठाकरे, गजानन ढाकुलकर, प्रशांत ढोले ही प्रतिष्ठित मंडळी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.